Rupali Chakankar : ‘प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यासह देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. परिणामी, आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधा मिळत नाहीत. या सर्व परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

रुपाली चाकणकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचे कौतुक करत आहेत. आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढे पछाडले आहे की त्यांना काय आरोप करावे याचेही भान राहिलेले नाही. नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही. वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो’, असा टोलाही लगावला.

काय म्हणाले होते दरेकर?

उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे. कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेले व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, कोरोना लस इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?, असे प्रवीण दरेकर म्हणाले होते.