‘फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षावर कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्रानं पाहिलीय’, राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्यानं काढला चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या गृहमंत्र्यांवर चिखलफेक करणाऱ्यांनो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपला लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे तपास दिल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. रुपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या मुन्ना यादव सारख्या गुंडाला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद आहे. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने जरी राज्याचा कारभार कसा करावा हे आघाडी सरकारला शिकवू नये.

देवेंद्र फडणवीस असताना वर्षा बंगल्यावर कुख्यात गुंड भेटल्याच्या बातम्या महाराष्ट्राने पाहिली आहे, अशा आठवण करुन देत त्यांनी भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. यासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकवर सर्वोच्च सुनावणी झाली.

न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, असे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरिट सोमैय्या आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.