…म्हणून नागपूरच्या संत्र्यांसाठी शरद पवारांचा थेट ‘चीन’ला ‘कॉल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरची प्रसिद्ध संत्री बऱ्याच देशात जातच नाही हे कळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. नागपूरची संत्री चीनमध्ये निर्यात केली जात नाही हे कळल्यावर शरद पवारांनी चीनमधील भारतीय वाणिज्य समन्वयक प्रशांत लोखंडेंना तातडीने फोन लावला. पवारांनी लोखंडेंना संत्री निर्यातीसाठी पुढाकार घेण्याची सूचना दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवारांनी धाव घेतल्याने शेतकरीही सुखावताना दिसले.

परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी शरद पवारांनी नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संत्र्यांच्या बागांना भेट देत गळून पडलेल्या सत्र्यांची पाहणी केली. संत्री उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी अशी गरजही त्यांनी सांगितली. पवारांनी रविभवन सभागृहात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न समोर आल्यानंतर पवारांनी त्यावर उपाय केले जातील असे आश्वासनही दिले.

प्रायोरिटी प्रोटोकॉल लिस्टमध्ये नाही असेही शेतकऱ्यांनी पवारांना सांगितले. पवारांनी शेतकऱ्यांना महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मोबाईल नंबर दिला. याशिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, माजी मंत्री अनिल देशमुख, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे आदींचा समावेश करत 5 ते 6 जणांची एक समिती स्थापन करून संत्र्यांबद्दल सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना पवारांनी दिली.

यावेळी शरद पवार म्हणाले, “येत्या 18 नोव्हेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या काळात संबंधित समितीच्या सदस्यांच्या शिष्टमंडळासह मी स्वत: केंद्रीय अर्थमंत्रालय आणि कृषी मंत्रालयाच्या सचिवांसह अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.” असेही त्यांनी सांगितले

Visit : Policenama.com