काय सांगता ! हो – हो ‘सध्या सत्ता स्थापन करणं शक्य नाही’, शरद पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या तरी सरकार स्थापन करणं शक्य नसून थोडा वेळ लागणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. इतकेच नाही तर 5 वर्ष सरकार टिकेल याच दृष्टीकोनातून चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीकोनातून चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असल्याने सरकार नेमकं कसं स्थापन करावं याबाबत विचार केला जात आहे.

शरद पवार म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना आम्ही या मुद्द्यावर कायम राहू. मुस्लिम आरक्षणाबाबत कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये चर्चा करू. सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही. परंतु मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. 5 वर्ष स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणारं सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्र्यांबद्दल काहीच विचार नाही. शिवसेना आणि काँग्रेस सोडून इतर कोणाशीही चर्चा करणार नाही” असंही पवारांनी स्पष्ट केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबद्दल एकमत झाले आहे. यानुसार, शिवसेनेला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि 14 मंत्रीपदे दिली जातील. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकेक उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीला 14 तर काँग्रेसला 12 मंत्रीपदे मिळणार आहेत असे समजत आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सतत चर्चा सुरू आहे.

Visit : Policenama.com