मोठी बातमी : ED कडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना ‘ई-मेल’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि इतर राजकीय नेत्यांवर ईडीकडून (सक्‍तवसुली संचलनालय) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, शरद पवार यांनी स्वतःहून शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं जाहिर केलं होते. आता ईडीने शरद पवार यांना ई-मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे.


ईडीनं पवार यांना तुर्तास तरी तुमच्या चौकशीची गरज नसल्याचे सांगितले आहे तसेच कार्यालयात येण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. आगामी काळात गरज भासल्यास नोटीस अथवा समन्स पाठवू त्यानंतर तुम्ही कार्यालयात येऊ शकता असं सांगण्यात आलं आहे. ईडीकडून मेल आल्याच्या वृत्‍ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातून शरद पवारांच्या समर्थकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर सकाळपासूनच गर्दी केली आहे. शरद पवार यांना ईडी कार्यालयात जावू नका म्हणून मुंबई पोलिस आयुक्‍त देखील पवारांच्या घरी पोहचले आहेत. मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.