पार्थ पवार ‘अपरिपक्व’ ! त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार अपरिपक्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार बोलत होते. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत.

सीबीआयबाबत जे बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे पवार यांनी सांगितले.