SSR Case : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर शरद पवार यांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या सोशल मीडियावर आणि इतर प्रसारमाध्यमांवरही अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरण अधिक प्रमाणात चर्चिले जात आहे. यावर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर मला 100 टक्के विश्वास आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की, एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण, ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे, याचं आश्चर्य वाटत आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

शरद पवार पुढेही म्हणाले की, माझ्या जिल्ह्यात 20 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. पण, मीडियाने त्याची नोंद देखील घेतली नाही, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केलीय.

महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला 100 टक्के विश्वास आहे. पण, तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा, असे वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची? हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असे देखील शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यासंबंधी पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही.तसेच ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असेही देखील त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, यामागे नेमका काय हेतू आहे? हे मी सांगू शकत नाही.