‘या’ निवडणुकीत ‘राष्ट्रवादी-शिवसेना’ आमनेसामने !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 3 पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. परंतु स्थानिक पातळीवर मात्र या पक्षांचे आपापल्या सोयीचं राजकारण सुरूच आहे असं दिसतंय. अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खास बात अशी की, राष्ट्रवादीच्या या उमेदवारानं आजच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पूर्वी महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत सर्वाधिक जागा मिळवलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या नवीन खेळीची चर्चा सुरू आहे. पारनेर नगरपंचायतीप्रमाणे याचेही पडसाद वरिष्ठ पातळीवर उमटण्याची शक्यता आहे.

उद्या महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नगरसेवक मनोज कोतकर यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने योगीराज गाडे यांना रिंगणात उतरवलं आहे.

सभापतीपदासाठी भाजपचे मनोज कोतकर इच्छुक होते. मात्र स्थायी समितीतील 16 नगरसेवकांपैकी राष्ट्रादीचे 5, शिवसेनेचे 5, भाजपचे 4, काँग्रेस आणि बसपा यांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. राज्यातील सत्तेचं समीकरण पाहता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे एकूण 11 सदस्य स्थायी समीतीत आहेत. त्यामुळं भाजपचे नगरसेवक कोतकर यांना ही निवडणूक सोपी नव्हती. त्यातच त्यांनी आज अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज भरला. विशेष म्हणजे या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले आणि कुमार वाकळे हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनीही स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज भरला आहे. गाडे यांना विजय पठारे हे सूचक तर शाम नळकांडे हे अनुमोदक आहेत.

अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळं आता ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले कोतकर व शिवसेनेचे गाडे यांच्यामध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार हे निश्चित आहे. त्यामळं राज्यातील सत्तेचं समीकरण पाहता, ऐनवेळी दोघांपैकी कोणत्या पक्षाचा उमेदवार माघार घेणार आणि लढत झाली तर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, “आज झालेल्या राजकीय घडामोडींबद्दल वरिष्ठ स्तरावर माहिती दिली आहे. तिथून ज्या पद्धतीनं आदेश येईल तसा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल.”

भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, “आमच्या पक्षातील नगरसेवकानं राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याबाबत काय भूमिका घ्यायची हे आम्ही लवकरच बैठक घेऊन ठरवणार आहोत.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like