महाराष्ट्र कुणाची ‘जहागिरी’ नाही, खा. अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रेत ‘गरजले’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री कोण व्हावा, यासाठी युतीमध्ये लढाई सुरु आहे. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना-भाजप युतीचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नगरमध्ये आली आहे. या यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदींसह पक्षाचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते उपस्थित होते.

खा. कोल्हे म्हणाले की, दुष्काळ व पुरग्रस्तांना मदत न करता मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून यात्रा काढत आहेत. या यात्रा केवळ निवडणुकीसाठी काढल्या आहेत. सरकारने गेल्या पाच वर्षात काय काम केले, असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. जीएसटी लागू केल्यानंतर दहशतवाद पूर्णपणे संपला, असे सरकार म्हणत होते. पण खरोखरच दहशतवाद संपलाय का, अजूनही हा प्रश्नच कायम आहे.

वरची वीट ढासळली म्हणून खालची ढासळत नाही

राष्ट्रवादीचे अनेक नेते इतर पक्षांत प्रवेश करत आहेत. याबाबत बोलताना खा. कोल्हे म्हणाले की, पवार साहेबांच्या विचारांवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. वरची वीट ढासळली म्हणून खालची वीट ढासळत नाही. नेते गेले असले तरी कार्यकर्ते पक्षातच आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीत फक्त सहाच आमदार होते. त्याचे ६० झाले हा इतिहास आहे. मग कोणीही सोडून गेले त्याने फरक पडत नाही.

आरोग्यविषयक वृत्त