शरद पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते, ते बोलू शकतात, पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांचं उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचा कठोर शब्दांत समाचार घेतल्यानंतर पार्थ यांचे वडील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेटीचा तपशील माध्यमांना दिला आहे.

दीड तास चालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नते आहेत. ते बोलू शकतात. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ही बैठक कालच ठरली होती. यात पार्थ प्रकरणावर चर्चा झाली नाही तर इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच पार्थ पवार यांच्याकडून पक्ष स्पष्टीकरण मागणार का असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले, असं कोणतंही स्पष्टीकरण मागण्याचा प्रश्नच येत नाही. पार्थ यांनी जर एखादी मागणी केली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. त्याला पक्षाशी जोडण्याचे कारण नाही.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजोबांनी नाताला किती महत्त्व द्यायचं आणि नातवाने आजोबांच्या भूमिके प्रमाणे वागायचं का हे त्यांनीच ठरवायचं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.