राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रचारापासून बाजूला व्हा अन्यथा जीवे मारू अशी धमकी एका निनावी फोनद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांना देण्यात आली आहे. त्यांना ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारापासून दूर राहण्याची धमकी दिली असून त्यांना रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तीने हा फोन केला होता.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील वातावरण चांगलेच गरम झाले आहे. भास्कर विचारे यांना दोन शिवसेना आमदारांची नावे घेत धमकी दिली आहे. त्यांना फोन करून संजय दिना पाटील यांच्या प्रचारापासून लांब राहा अन्यथा जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर विचारे यांनी याप्रकरणी भांडूप पोलिसांत तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फोन करणाऱ्याला ताब्यात घेतलं असल्याचं समोर आलं आहे.