राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन  – राष्ट्रवादीच्या कल्याण येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे आणि घोषणाबाजीमुळे मेळावा आटोपता घ्यावा लागला आहे. जे पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात नसतात त्यांची नावे जाहीर केल्याचा तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी  जोरदार घोषणाबाजी झाली.

राष्ट्रवादीचे कल्याण लोकसभा उमेदवार बाबाजी पाटील आणि काँग्रेसचे भिवंडी लोकसभा उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी महिला मंडळ सभागृहात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते मेळाव्याची रूपरेषा स्पष्ट करण्यासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवलीत कुणी काय काम करायचे यासंदर्भात एक टीम तयार केल्याचे जाहीर केले. विधानसभा मतदारसंघनिहाय ते पदाधिकाऱ्यांची नावे पुकारत असताना व्यासपीठासमोर एकच गोंधळ उडाला. जे पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात नसतात त्यांची नावे जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची जोरदार घोषणाबाजी झाली.  निष्ठावंतांना डावलून हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्त्व दिले जात असल्यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचे काही कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावले. जे पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित नाहीत त्यांच्यावरच महत्त्वाची जबाबदारी देऊन पक्षाला काय सिद्ध करायचे आहे असा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील दुहीमुळे आणि घोषणाबाजीमुळे मेळावा आटोपता घ्यावा लागला. कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेता निरीक्षक पिसाळ यांनी हनुमंते यांना ही यादी मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतरच गोंधळ शांत झाला.