खा. सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा, म्हणाल्या – ‘BJP मध्ये अनेकजण वैतागलेले’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे धोरण हे जनतेसाठी नव्हे तर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसाठीही धोक्याचे आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. कोल्हापूरातील पत्रकार परिषदेमध्ये त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार्‍या कार्यकर्त्यां संदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी भविष्यात अनेकजण भाजप पक्षाला टाटा करतील, असा अंदाज वर्तवलाय. कोल्हापुरातील जिल्हा परिषदेमध्ये उभारलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी सुळे त्यांनी सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भाजपचे काही कार्यकर्ते पक्ष सोडून राष्ट्रवादीकडे येत आहेत, याबाबत त्यांना विचारले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपमध्ये दडपशाहीचे धोरण असून याला कंटाळून अनेकजण तो पक्ष सोडत आहेत. त्या पक्षामध्ये दडपशाही आहे, हे मला माहित आहे. त्यामुळे भविष्यातही अनेकजणांनी हा पक्ष सोडला तर, आश्चर्य वाटायचे कारण नाही.

याशिवाय त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. यावेळी सुळे म्हणाल्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार गंभीर नाही. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. केवळ दिखावा करण्यासाठी बैठका घेतल्या जाताहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आंदोलकांशी पोलिसाकडून चांगली वागणूक मिळत नाही. निधी वाटपावेळी केंद्राकडून महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सूड भावनेचा दिसतोय, असेही त्यांनी म्हंटलंय.