सुप्रिया सुळेंनी रणजितसिंह मोहिते पाटलांना दिलं ‘हे’ ‘ओपन चॅलेंज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘रणजितसिंह मोहिते पाटील यांना माझं खुलं आव्हान आहे की, त्यांना आजवर राष्ट्रवादीने काय दिलं नाही याची चर्चा समोरासमोर करा’ असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. एका वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवरही तोंडसुख घेतलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. रणजितसिंहांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनीही आता रणजितसिंहाना समोरासमोर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले आहे.

‘निवडणुकांसाठी विरोधक कोणी ना कोणी असणारच आहे’

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकांसाठी विरोधक कोणी ना कोणी असणारच आहे. पण त्यासाठी मी माझा अभ्यास पूर्ण करून आता परीक्षा देणार.” याशिवाय ‘माझ्या कामाचं मुल्यमापन करून जनता मला मतदान करेल’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल ही लढत रंगणार आहे. कांचन कुल यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत. त्यामुळे बारामतीची लोकसभा अटीतटीची होणार हे मात्र नक्की.

पार्थ पवारांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

पार्थ पवार यांच्याबाबत भाष्य करताना सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, “कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तक कसं असेल ते ठरवू नका.” असे म्हणत त्यांनी पार्थ यांची बाजू मांडली. पार्थ पवारांच्या मावळमधील सभेत त्यांनी पहिल्यांदाच तीन मिनिटांचं भाषण केलं होतं. मात्र, आजोबा आणि बाबांसमोर बोलताना ते अडखळले होते. त्यामुळे पार्थ पवारांच्या त्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली. लोकसभेसाठी उभं राहणाऱ्या उमेदवाराला साधं भाषण करता येऊ नये का असा सवाल विचारत सोशलवर पार्थ यांना ट्रोल करण्यात आलं होतं.