पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे सुप्रिया सुळेंचे आणखी एक ट्विट; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने सध्या ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तसेच त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून, ते त्यांचे रोजचे आवडते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत’. शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेतेमंडळी आणि हजारो कार्यकर्ते, लोकांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या.

दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी विचारपूस केली. त्यानंतर आता शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे ट्विट खासदार सुळे यांनी केले आहे.