50 कोटीच्या खंडणी प्रकरणी उपाध्यक्ष मंगलदास बांदल राष्ट्रवादीतून निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतचा निर्णय आज जाहीर केला आहे. पुण्यातील एका सराफाकडे 50 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.


पुण्यातील एका सराफाकडे 50 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीपैकी एक आरोपी हा आपले काम पहात असल्याची माहिती मंगलदास बांदल यांनी संबंधित सराफाला खंडणी मागण्याच्या काही दिवस अगोदर दिली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी शुक्रवारी (दि.13) बांदल यांची चौकशी केली होती. बांदल यांच्यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच पक्षाने त्यांची हाकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसारमाध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरु असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांनी पक्षातून निलंबित करण्यात असल्याचे पक्षाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.