‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त असतात’, राष्ट्रवादीचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप प्रणित एनडीए बरोबर येत सरकार स्थापन करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत, ‘कधी कधी काही मानस जास्तच बोलतात त्यातील मंत्री रामदास आठवले हे एक आहेत’, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

यासंदर्भात बोलताना महेश तपासे म्हणाले, सरकारने ज्या वर्गाच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्याला बगल देत नुसती कविता करण्यात व्यग्र असतात आणि फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल मग ते कोणतेही कारण असो त्याच प्रयत्नात असतात. मोदी सरकार एकीकडे हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना त्या कंपन्यातील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपलं मंत्रालय काय करत आहे ? असा प्रश्न त्यांनी रामदास आठवलेंना उपस्थित केला.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या आर्थिक मंदीमुळे उध्वस्त झालेल्या मागास समाजातील उद्योजक, अल्पभूधारक शेतकरी या वर्गातील नागरिकांसाठी आपण फक्त कविताच केली का, असा सवालही तपासे यांनी रामदास आठवले यांना विचारला.

रामदास आठवले यांनी काय म्हटलं होत ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारसोबत यावे. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीस सत्तेत वाटा मिळेल, असं रामदास आठवले म्हणाले होते. महाविकास आघाडीत नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध होता. यामुळे राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण होते. तर कोरोना काळात घेतलेल्या निर्णयात स्थान न मिळाल्याची काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्रीपदावरुन सुचवला पर्याय

‘उद्धव ठाकरे जवळपास एक वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अजून एखादं वर्ष मुख्यमंत्री पदी राहावे. त्यानंतर तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, असा पर्याय आठवलेंनी सुचवला होता. ‘भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेला होणार असून, त्यांना केंद्रात एक-दोन मंत्रिपद मिळतील’, असे सुद्धा त्यांनी म्हटलं होत.