कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये NCP ला मोठा धक्का ! शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा BJP मध्ये प्रवेश

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तळकोकणातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नितेश राणे यांच्यासह भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, सचिन तेंडुलकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

काही दिवसापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे कुडाळ पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आली होती. त्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात पर्यायाने शिवसेनेला धक्का देत राणे यांनी कुडाळच्या सभापतींना भाजपमध्ये आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले आहे.