अहमदनगर : विखेंसाठी राष्ट्रवादीची माघार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत. जिल्हा बँकेसाठी विकास सेवा संस्था मतदार संघातून राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज भोसले यांनी मागे घेतला. त्यामुळे विखे समर्थक जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड झाली तर पार्थर्डी तालुक्यातही एका उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या आमदार मोनिका राजळे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. 21 पैकी चार जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या असून यातील तीन जागा विखेंच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत वेगळ्या राजकारणाचे दर्शन होऊ लागले आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत पुढील आठवड्यापर्यंत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. ही निवडणूक नेहमीच विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकामध्ये रंगते. सध्या थोरातांचे या बँकेवर वर्चस्व आहे. यावेळी विखे पाटील यांनी भाजप आणि आपल्या मुळ समर्थकांच्या मदतीने पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे पवार कुटुंबियांनी यामध्ये लक्ष घालून महाविकास आघाडीला ताकद दिली आहे.

मात्र आता या निवडणुकीतील राजकारणात बदल होताना दिसत आहे. आज जामखेडमधून राष्ट्रवादीचे भोसले यांनी माघार घेतली आपण रोहित पवार यांच्या सांगण्यावरुन माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या सुचनेवरुन आपण माघार घेत असल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच आपण विखे समर्थक आहोत आणि राहणार. मात्र, जामखेड तालुक्यात आमदार पवार यांनाच साथ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमके काय राजकारण सुरु आहे, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या उर्वरीत काळात काय होते, निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहील आहे.