शिवसेना पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला

तापोळा (महाबळेश्वर) : पोलीसनामा ऑनलाईन- राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच किरकोळ कारणावरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. महाबळेश्वर शिवसेना तालुका प्रमुख संजय शेलार व त्यांच्या सोबत असलेल्या तापोळा विभागीतील शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सकपाळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोट्रोशी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संजय शेलार हे गंभीर जखमी झाले आहेत. तर हरिभाऊ सकपाळ यांनाही मार लागला आहे. जखमींवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या हल्ल्याची बातमी समजताच तापोळा विभागातील शिवसैनिक तापोळा येथे जमा झाल्याने तणाव निर्माण झाला. मेढा पोलीस ठाण्याचे फौजदार राठोड यांनी तात्काळ तापोळा येथे धाव घेऊन परीस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी राष्ट्रवादीची महाराष्ट्रात होत असलेली पिछेहाट व राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांची निराशा यातून हा हल्ला झाला असावा, असे बोलले जात आहे. हल्ल्याची बातमी समजताच सर्व शिवसेना कार्यकर्ते, समर्थक, तापोळा पोलीस ठाणे व आरोग्य केंद्राच्या आवारात जमा झाले. सर्वांनी शांत राहावे व आचारसंहिता असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी यांचे आवाहन फौजदार राठोड यांनी केले. दरम्यान, आरोपींच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर हल्ला करून गावातून पसार झाले आहेत. या संपूर्ण हल्ल्याचा तपास मेढा फौजदार राठोड, तापोळा औटपोस्टचे जगताप व त्यांचे सहकारी करत आहेत.

Loading...
You might also like