कुस्ती काय असते हे शरद पवारांनी निवडणुकीत दाखवले; राष्ट्रवादीचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. काही दिवसापूर्वी शेतकरी आंदोलनासंदर्भात पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर देशात अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यामध्ये भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरपासून अनेक बॉलिवूड कलाकारांचा सहभाग होता. यावरून विरोधकांनी सेलिब्रिटींवर टीकास्त्र सोडले होते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला खोचक सल्ला दिला होता. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी निवडणुकीत कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. पवारसाहेब आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना लगावला.

सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर देताना मेहबूब शेख म्हणाले, जिल्हा परिषदेत निवडणुकीत
तुमचा मुलगा पडला, कोणाच्या बाबतीत काय बोलावं हे समजत नाही. शरद पवारांबाबत बोलताना त्याचं भान ठेवलं पाहिजे. शरद पवार बीसीसीआयमध्ये होते. त्यांच्याच कारकिर्दित क्रिकेटमध्ये २०-२० सामने सुरू झाले, वर्ल्ड कप सुरू झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तर गाव पातळीवर खेळले आहेत असा टोला लगावला. तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, तिथले पवारसाहेब संस्थापक आहेत. या वयात त्यांनी कुस्ती खेळणं सदाभाऊंना अपेक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, कोणाच्या बाबतीत काय बोलावं ते त्यांना समजत नाही. ते काहीही बोलू शकतात असंही शेख यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
शेतकरी आंदोलनासंदर्भात क्रिकेटपटूंसह आणिक कलाकारांनी ट्विट केल्यानंतर शरद पवारांनी सचिन तेंडुलकर याला खोचक सल्ला दिला होता. त्यावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, असा सवाल उपस्थितही त्यांनी उपस्थित केला होता. लंगोट घालून शरद पवार यांनी कधी कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही. ते कधी हिंद केसरी झाले होते का, ही माहिती मी जुन्या लोकांकडून घेतली, तर त्यांनीही नाही म्हणून सांगितले. लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळले असतील ते सोडा. पण तरीही ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले ना अशा शब्दात सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या टीकेचा खोत यांनी समाचार घेतला होता. मी सोडून बाकीच्यांना काही कळत नाही, अशी कमी लेखण्याची पद्धत काही मंडळींनी पडली आहे. अनुभवातून एखाद्या क्षेत्रात दीर्घ काळ राहिल्यास आपल्यालाच सर्व काही समजते. सर्व अधिकार आपल्यालाच आहे हि मानसिकता राज्यात उभारतेय, हे चुकीचे असून हानीकारक आहे असं मला वाटतं अशी टीकाही खोत यांनी केली होती.