राष्ट्रवादीचा ‘तो’ सदस्य ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील ईट गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गिते यांना उस्मानाबादसह ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे भूम, परंडा, वाशी तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईट जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य ज्ञानेश्वर गिते यांच्यावर पुणे, भूम, वाशी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. सन २००७ ते २०१८ या कालावधीत त्यांच्याविरूध्द तब्बल ६ गुन्ह्याची नोंद झाली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यासंदर्भात गिते यांचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी याच्यांकडे दाखल केला होता. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी श्री. गिते यांना नोटीस पाठवली होती. याप्रकरणी गिते यांनी वकिलाच्या माध्यमातून हजर होत आपले म्हणणे सादर केले होते. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी श्री. मोरे यांनी गिते यांच्या हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत.