रात्री उशिरा झालेल्या बैठकीत धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैगिंक शौषणाच्या तक्रारीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, तक्रारदार रेणू शर्मा विरोधात भाजप व मनसे नेत्यांनी आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाला हनी ट्रॅप असे संबोधले जाऊ लागले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर पक्षांतर्गत कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे सध्या तरी मंत्रीपद बचावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रफ्फुल पटेल यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक आदि बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत त्यात तक्रारदार महिलेची तक्रार संशयाच्या भोवर्‍यात आली आहे. हा एक हनी ट्रॅप असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांची चौकशी होऊ द्या, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या बैठकीत दिसून आला. तूर्त मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या आरोपांबाबत जी कबुली दिली. त्यामुळे एक राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच रेणु शर्माच्या विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे व मनसे नेते मनीष धुरी हे पुढे येऊन त्यांनी आपल्यालाही रेणू शर्माने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्याचवेळी जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनाही हॅनी ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.  त्या अगोदर शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. धनंजय मुंडे काल स्वत: मला भेटले. त्यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, त्यात फारसा विलंब होणार नाही, असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले होते. पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार, असे आराखडे बांधले जाऊ लागले होते. मात्र, त्यानंतर हेगडे, धुरी यांनी पुढे येऊन तक्रारदार रेणू शर्मा यांच्यावरच आरोप केल्याने राष्ट्रवादीने मुंडेंवर पक्षांतर्गत कारवाई सध्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.