राष्ट्रवादीचे कॅप्टन ७ दिवसात १२ वा खेळाडू म्हणून परतले : देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि ७ दिवसात १२ वा खेळाडू म्हणून परतले असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

शरद पवारांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि ७ दिवसात माघार घेत १२ वा खेळाडू म्हणून परतले. अशी अवस्था विरोधकांची आहे तर दुसरीकडे आपण सुजयच्या रुपाने युवा बॅट्समन उतरवला आहे. ‘ मोदींची मागची सभा याच मैदानावर झाली होती, त्यावेळी नगर आणि शिर्डीची जागा जिंकली होती, यावेळीही तेच होणार, दोन्ही जागा प्रचंड मतांनी जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाषण थांबवल्याने दिलीप गांधी भडकले –

अहमदनगरच्या जागेवर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कट करून काँग्रेसमधून पक्षांतर केलेले सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गांधी नाराज आहेत. सभेमध्ये दिलीप गांधी यांना मंचावरून भाषण करताना थांबवण्यास सांगितलं त्यामुळे गांधी भडकले आणि भाषणात विखेंचं नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन त्यांनी केलं. गांधी यांची समजूत काढताना फडणवीस म्हणाले की, दिलीप गांधी तुम्ही चिंता करु नका, आम्ही तुमच्याही पाठिशी उभे आहोत.’

सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप सामना –

मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर मतदार संघ चर्चेत आहे. आघाडीच्या जागावाटपावरून विखे परिवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाद सुरु होता. त्यामुळे काँग्रेसच्या सुजय विखेंनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत अहमदनगर मतदारसंघात थेट राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.