बीड जिल्ह्याची ‘तहान’ भागविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चा पुढाकार

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे संकट आहे. हळू हळू हे संकट जास्त गडद होताना दिसत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. याच दुष्काळात होरपळत असलेल्या बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. ४० हजार लिटर क्षमतेचे २१ पाण्याचे टँकर ऍग्रीकल्चर ट्रस्टमार्फत बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रोहित पवार यांच्या हस्ते आज या पाण्याच्या टॅंकरचे लोकार्पण झाले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवगण राजुरी(बीड) येथील चार छावणीला भेट दिली होती. परिसरातील पाण्याचं दुर्भिक्ष्य बघून साहेबांनी तिथं पाण्याची व्यवस्था करण्याचा शब्द दिला होता. शरद पवार यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता रोहित पवार करत आहेत.

बीड जिल्ह्यातील आणखी १०० गावांमध्ये सुमारे १० लाख लिटर क्षमतेचे हे टँकर पाणीपुरवठा करतील, अशीही माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात आणखी ९ टँकर लवकरच दाखल होणार आहेत. दरम्यान, देशातील लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांना राज्यातील भीषण दुष्काळ स्थितीचा विसर पडला होता. मात्र, लोकसभा निवडणूक संपताच आता सर्व राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा राज्याकडे आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. विधानसभेच्या तयारीचा भाग देखील याला म्हणता येईल.