राष्ट्रवादीचे कोकाटेंना आवतन, भुजबळांचे मात्र मौन

सिन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – वाट चुकलेले पक्षीदेखील घरी परत येतात. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना काँग्रेस सोडल्याचा पश्चाताप होत असेल, तर त्यांनी राष्ट्रवादीत यावे, असे खुले निमंत्रण आ. जितेंद्र आव्हाड यांनी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना दिले. त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले छगन भुजबळ यावर बोलतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, भुजबळांनी आव्हाड यांच्या प्रस्तावावर मौन बाळगले.

मागील आठवड्यात कोकाटे यांनी काँग्रेस सोडले, ही सर्वात मोठी चूक झाल्याची कबुली दिली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेच्या सिन्नर येथील सभेत आव्हाड यांनी कोकाटे यांना राष्ट्रवादीचे खुले निमंत्रण दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, चित्रा वाघ, समीर भुजबळ यांच्यासह पक्षाचे जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, दूर गेलेला पक्षीदेखील घरी परत येतो. तुम्ही तर अजून खूप दूर गेलेले नाहीत.