दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या बैठका सुरू

युतीचा मात्र अजून उमेदवारच ठरेना

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – लोकसभेचे बिगुल वाजताच अनेक दिग्गज पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काही पक्षांनी घोंगडी बैठका घेऊन प्रचार सुरू केला आहे पण पुण्यातील काही लोकसभा मतदार संघात अजूनही युतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.

अशीच काहीशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी घोंगडी बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे परंतु युतीकडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याने युतीच्या गोटातील कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात नक्की कोण लढणार आहे हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे.

एकीकडे सुळेंच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल किंवा त्यांच्या मातोश्री श्रीमती रंजना कुल हे लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मात्र येथे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हेच उमेदवार असतील असे भाकीत वर्तवले जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार , जिल्हापरिषद महिला बालकल्याण सभापदी राणी शेळके, वीरधवल जगदाळे यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये घोंगडी बैठका घेऊन सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या बैठक सुरू झाल्या पण अजूनही आपला उमेदवार जाहीर होत नसल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरू लागली आहे. युतीने लवकर उमेदवार जाहीर केला नाही तर याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो अशी भीती काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.