राष्ट्रवादीची दुसरी यादी लांबण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी-काँग्रेसची दुसरी यादी लांबण्याची शक्यता आहे. माढा आणि नगरच्या जागेवरील उमेदवारीवरुन पक्षात गोंधळ आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी मुंबईत ११ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये माढा आणि अहमनदरच्या जागांचा समावेश नव्हता.

राष्ट्रवादी-काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर माढा येथून कोण उमेदवार असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र आपल्याऐवजी मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी विजयसिंह यांनी केली आहे. मात्र भाजपशी वाढत्या जवळीकतेमुळे राष्ट्रवादीत रणजितसिंह यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे माढ्यातून कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय अद्याप झाला नाही.

दुसरीकडे अहमदनगरची जागा काँग्रेसला न सोडता आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. अहमदनगरमध्ये अरुणकाका जगताप यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र भाजपमध्ये गेलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा सामना करण्यासाठी तरुण उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. त्यादृष्टीने अरुणकाका जगताप यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांच्या नावावर पक्षात विचार सुरु आहे. या कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.