भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीचं ‘प्लॅनिंग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचे सांगत त्यांना लवकरच पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले. त्यातच आता राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीने भाजपमध्ये गेलेल्या आपल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षांचे राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर असणार आहे.

लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांचा प्रवेश करुन घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. आमदारांना घेताना शिवसेना व काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचेही सुत्रांकडून माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला हा दावा जर खरा ठरत असेल तर ते कोणते आमदार पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.