राष्ट्रवादी काँग्रेसचा कन्हैया कुमारच्या उमेदवारीला पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी म्हंटले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान, ज्या ठिकाणी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधात ताकद देणार आहोत. शिवाय वाराणसीमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी हिरीरीने उतरणार असून राष्ट्रवादीचे नेते रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार आहे. तसेच बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, बिहारच्या बेगुसरायमधून कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढवणार आहे. महाआघाडीने तिकीट न दिल्याने कन्हैया कुमार बेगुसराय मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे.