NDA फक्त नावाला असून पंतप्रधानांनी इतक्या वर्षात बैठकही बोलावली नाही – सुखबीर सिंग बादल

पोलिसनामा ऑनलाईन : भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए फक्त नावाला असून इतक्या वर्षांत पंतप्रधानांनी एकही बैठक बोलावली नाही. असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने रात्री एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मागच्या 10 वर्षापासून एनडीए फक्त नावाला आहे. एनडीएमध्ये कुठली चर्चा होत नाही, काही प्लानिंग नाही किंवा कुठली बैठक होत नाही. मागच्या 10 वर्षात पंतप्रधानांनी त्यांच्या मनात काय आहे? यावर चर्चा करण्यासाठी लंचला एनडीएची बैठक बोलावल्याचे मला आठवत नाही अशी खंत सुखबीर सिंग बादल यांनी बोलून दाखवली आहे. आघाडी फक्त कागदावर असू नये. यापूर्वी वाजपेयी यांच्या काळात एनडीएमध्ये योग्य पद्धतीने संबंध जपले जायचे. माझे वडिल एनडीएचे संस्थापक सदस्य आहेत. आम्ही एनडीए बनवली पण आज एनडीए नाहीय हे खूप दु:खद आहे असेही बादल म्हणाले.राज्यामध्ये आम्ही नेहमीच भाजपाला सोबत घेतले आहे. माझे वडिल प्रकाश सिंग बादल यांनी ज्या पद्धतीने आघाडी चालवली, तसा कारभार असला पाहिजे. प्रत्येक निर्णयासाठी ते भाजपाला बोलवायचे. आम्ही जेव्हा, कधी राज्यपालांना भेटायला गेलो, भाजपा आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.