नुसत्या चर्चाच रंगतायत ; निर्णय आला नाही , तर आम्ही आमचा निर्णय घेऊ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप – सेना युतीच्या प्रचारसभा , महामेळाव्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत . त्यामुळे त्याचा परिणाम आघाडीच्या मित्रपक्षांवर होताना दिसत आहे . त्यांच्यातील अस्वस्थता वाढली आहे . स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी त्यावर आपलं मत व्यक्त केले आहे. युतीचा निवडणुकीचा पूर्ण आराखडा तयार होतो , आघाडीत मात्र चर्चाच संपत नाही, अशी नाराजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

एकीकडे युतीच्या प्रचारसभांच्या तारखा जाहिर होतात आणि आघाडीचे नेते चर्चेतच वेळ काढत आहेत. असंच सुरु राहिलं तर त्याचे नकारात्मक परिणाम होतील, अशी भीती तुपकरांनी व्यक्त केली आहे. उद्यापर्यंत स्वाभिमानीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर स्वाभिमानी अन्य मार्गाने जाईल. स्वाभिमानी १५ ठिकाणी उमेदवार उभे करेल, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. तसंच जर एकदा स्वाभिमानीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा आघाडीत बोलवले तर माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

युतीचा निवडणूकीचा संपूर्ण आराखडा तयार होतो, आघाडीत मात्र चर्चाच संपत नाही, अशी टीका तुपकर यांनी केली आहे. आघाडीने आता आणखी वेळ वाया घालवू नये. जागावाटप करुन लवकरात लवकर प्रचाराला लागलं पाहिजे. आणखी वेळ घालवल्यानं मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होत आहेत. आघाडीच्या मनात नेमकं आहे तरी काय? सत्ता परिवर्तनाबाबत आघाडीचे नेते खरंच गंभीर आहेत का ? असा सवालही तुपकर यांनी केला आहे.

दरम्यान , स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, वर्धा, बुलढाणा या जागांसाठी आग्रही आहे. त्यावर आघाडीने लवकर निर्णय घ्यावा, असंही तुपकरांनी सांगितलं.