दिलासादायक ! देशात 2 ‘कोरोना’च्या लशींची चाचणी, परिणाम आले सकारात्मक

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – देशातील दोन स्वदेशी लशींची चाचणी करण्यात येत असून या चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ज्यावेळी कोरोनाची लस तयार होईल तेव्हा भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. तसेच जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील विविध देश लशीसंदर्भात व्यक्तिगत स्वरुपात भारताशी संपर्क साधत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

रुग्ण बरे होण्याचा दर सकारात्मक

राजेश भूषण म्हणाले, देशात आतापर्यंत १० लाखांहून अधिक कोरोना संसर्गित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचा ७.८५ इतका होता. मात्र हा दर ६४.४ टाकी इतका झाला आहे. तसेच १६ राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर सरासरीपेक्षा अधिक आहे. यात दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के, लडाखचा दर ८० टक्के, हरियाणाचा दर ७८ टक्के, आसामचा दर ७६ टक्के, तामिळनाडू आणि गुजरातचा दर ७३ टक्के, राजस्थानचा दर ७० टक्के, मध्यप्रदेशचा दर ६९ टक्के आणि गोव्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ६८ आहे. त्यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सकारात्मक असून, यामध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचं भूषण यांनी म्हटलं.

समूह संसर्ग नाही !

देशात समूह संसर्ग झाल्याचा भूषण यांनी इन्कार केला. ७४० जिल्ह्यांपैकी फक्त ५० जिल्ह्यांमध्ये एकूण कोरोना रुग्णांच्या ८० टक्के रुग्ण आढळून आले आहे. शिवाय, ८० टक्के नव्या रुग्णांना बाधा कुठून व कोणामुळे झाली हे शोधून काढता येते, इतकेच नव्हे तर, त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना सुद्धा ७२ तासांच्या आतमध्ये आपण शोधून काढत आहोत. मग, समूह संसर्ग झाला कसे म्हणता येईल, असा युक्तिवाद भूषण यांनी यावेळी केला.

गेल्या २४ तासांत ५५ हजारांहून अधिक रुग्ण

देशात शुक्रवारी रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५५,०७९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या १६,३८,८७१ वर पोहचली. २४ तासांत ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण सक्रिय ( उपचार सुरु असलेले) रुग्णांची संख्या ५,४५,३१८ एवढी आहे. त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी १०,५७,८०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३५,७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.