डुलकी लागल्याने भारतात येण्याचे स्वप्न भंगले !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतात परतण्यासाठी एअरपोर्टवर आतुरतेने बघत असताना विमानतळावर डुलकी लागल्यामुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये एका 53 वर्षीय भारतीय व्यक्तीचे विशेष विमान सुटल्याचे उघडकीस आले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे.

अबूधाबीमध्ये स्टोरकीपर म्हणून काम करणारे पी. शाजहां यांना एमिरेट्स जंबो जेटने तिरूवनंतपुरमला यायचे होते. 1100 दिरहम (300 डॉलर) खर्च करुन त्यांनी भारतात परतण्यासाठी विशेष विमानाचे तिकीट काढले होते. या विशेष विमानाची व्यवस्था केरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्र (केएमसीसी) दुबईने केली होती. 427 भारतीयांना घेऊन या विशेष विमानाने उड्डाण घेतले, पण शाजहां या विमानातून प्रवास करु शकले नाहीत. कारण त्यावेळी त्यांना विमानतळावर झोप लागली होती. तिकीट कन्फर्म होण्याच्या प्रतीक्षेत रात्री झोप लागली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

सकाळी विमानतळावर चेक-इन आणि अन्य प्रक्रिया झाल्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी जवळपास दोन वाजता टर्मिनल तीनच्या वेटींग एरियात पोहोचलो. इतरांपेक्षा थोडा दूर बसलो होतो. पण साडेचारच्या नंतर मला झोप लागली. व्हिसा रद्द झाल्यामुळे ते विमानतळाबाहेर येऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासाठी काही पैशांची व जेवणाची व्यवस्था करत आहोत, असे विशेष चार्टर्ड विमानाचे आयोजक एस. निजामुद्दीन कोल्लम यांनी सांगितले.