‘प्लेग’च्या रुग्णांसाठी त्यावेळी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या जागेवर ‘कोरोना’ रुग्णांसाठी क्वारंटाईन कक्ष

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यात १८९७ मध्ये पसरलेल्या प्लेग साथीच्या रुग्णांकरीता जे हॉस्पिटल उभारण्यात आले होते त्याच जागेवर आता कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. ते ठिकाण म्हणजे हडपसर मधील ससाणेनगर होय. जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वी हि जागा प्लेग रुग्णांसाठी वापरण्यात आली होती. या प्लेगच्या साथीने हजारो जणांचे बळी घेतले होते. तेव्हा प्लेगचे रुग्ण जीव वाचवण्यासाठी धडपडत होते तेव्हा अशा रुग्णांना वाचविण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेते; ससाणे माळावर हॉस्पिटलची व्यवस्था केली. ज्यामुळे प्लेगबाधितांना आधार मिळाला.

या साथीत स्वत: सावित्रीबाई रुग्णांची सेवा करीत होत्या. .पूर्वीच्या ससाणे माळावर आता ससाणेनगर उभारले आहे. ससाणे माळावरील जुन्या हॉस्पिटलच्या जागेतच गेल्या सहा वर्षांत ससाणे एज्युकेशन ट्रस्टची शाळा उभारण्यात आली आहे. शाळेच्या तीन इमारती असून, त्यात ५३ खोल्या आहेत. शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून, त्याला आटोक्‍यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नव्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी खासगी हॉस्पिटलसह विविध ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर सुरू करण्यात येत आहे. सध्या दोन हजार रुग्ण आणि संशयितांसाठी अशा सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून आणखी काही भागांत क्वॉरंटाइन सेंटर उभारण्यात येत असून, त्यासाठी मूळच्या ससाणे माळावरची आणि नव्या ससाणेनगरमधील या शाळेच्या इमारती उपलब्ध करून देण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, “”पुणे शहराला सुरक्षित ठेवण्याची या जागेची परंपरा आहे. ती आताही कायम राहिली आहे. प्लेग पाठोपाठ कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत संस्थेने पुढाकार घेतला आहे. येथील तिन्ही इमारती विलगीकरण कक्षासाठी देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाशी चर्चा झाली आहे.

अशाप्रकारे कोरोना रुग्णांसाठी करण्यात आलेल्या ससाणे नगर मधील व्यवस्था हि प्लेगची त्या वेळेची परिस्थिती डोळ्यासमोर आणते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.