सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डिजीटल सुधारणांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर जलद गतीने कामे होताना दिसतात. परंतु याचा वापर करताना मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे आवश्यक आहे असे मत सायबर तज्ज्ञ दत्तात्रेय धाईंजे यांनी व्यक्त केले. पुणे महापालिका प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीने सायबर जनजागृती आणि तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेला पालिकेचे खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. यावेळी धाईंजे यांनी मार्गदर्शन केले.

ऑनलाइन खरेदी, फेसबुक, बोगस कॉल सेंटर्स, हकिंग या आधुनिक प्रकारच्या विविध माध्यमांद्वारे फसवणूक होते. वैयक्तिक माहिती, नंबर्स, पासवर्ड, मेल आयडी अशी माहिती खात्री न करताच कोणाला देणे म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे असे धाईंजे यांनी सांगितले. पासवर्ड, इमेल वापरताना तो अन्य ठिकाणी जाणार नाही याची खात्री करणे, चुकीच्या मोबाईल नंबरवर संवाद न साधणे, ओळख असल्याशिवाय माहिती न सांगणे, सुरक्षित ऑनलाइन बँकींग व शॉपचा वापर करणे, सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर करणे अशा सूचना त्यांनी दिल्या.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रगती होते त्याचे फायदे खूप असले तरी तोटेही आहेत. त्याकरिता तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. याकरिता ही कार्यशाळा आयोजित केली असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. उपायुक्त अनिल मुळे यांनी सूत्रसंचालन केले.