Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं ATM सेंटरवर जाऊ शकत नसाल तर घर बसल्या मागवू शकता पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभरात पुढील २१ दिवस लॉकडाउन केले गेले आहे. अशा वेळी तुम्हाला जर काही कामासाठी रोख पैसे हवी असतील आणि तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर घाबरू नका. यावेळी तुम्ही घरबसल्या बँकेतून पैसे मागवू शकता. एसबीआय, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, कोटक यासारख्या मोठ्या बँका ग्राहकांना ही सुविधा पुरवतात.

पैसे मागवण्याची अशी आहे प्रक्रिया

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार, घरी रोख पैसे मिळवण्यासाठी बँकेच्या संकेतस्थळावर Bank@homeservice येथे लॉग इन करावे लागेल किंवा कस्टमरकेअरवर कॉल करून देखील सुविधेचा लाभ घेता येतो. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तुम्ही पैसे मागवू शकता. दोन तासात आपल्याला आपले पैसे मिळतील. आपण २ हजार ते २ लाखापर्यंत अशी रक्कम मागवू शकता. या सुविधेसाठी एकरकमी शुल्क ५० रुपये आणि या शुल्कावर १८ टक्के सेवा शुल्क जोडले तर आपल्याला सुमारे ६० रुपये द्यावे लागतील.

एसबीआय ग्राहक २५ हजार रुपयांपर्यंत पैसे मागवू शकतात

४० कोटी ग्राहक असणारी एसबीआय बँक देखील आपल्या ग्राहकांना घरपोच डिलिव्हरीखाली घरीच रोख रक्कम मागविण्याची, पैसे जमा करण्याची सुविधा पुरवते. सध्या ही सुविधा केवळ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा विशेष नोंदी असलेल्या ग्राहकांसाठी आहे. याचे शुल्क १०० रुपये आहे. देशातील सर्वात मोठी दुसर्‍या क्रमांकाची बँक एचडीएफसी देखील घरी रोख रकमेची उपलब्धता करते. त्यांची सीमा ही ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी बँक १०० ते २०० रुपयांपर्यंत शुल्क आकारते. कोटक, अ‍ॅक्सिस आणि इतर बँकादेखील काही अटींसह अशा सेवा देतात. पैसे मागविण्याची विनंती करण्यासाठी आपण बँकेचे अ‍ॅप देखील वापरू शकता.

गरज भासल्यास कर्ज घेणे देखील शक्य

आपल्याकडे बँकेत पैसे नसल्यास आणि तत्काळ पैशाची आवश्यकता असल्यास तत्काळ कर्ज देणार्‍या सर्व फिनटेक कंपन्या देखील आपल्याला मदत करू शकतात. मनीटॅपचे सीबीओ कुणाल वर्मा यांचे म्हणणे आहे की कोणतेही ग्राहक फक्त अ‍ॅपद्वारे केवायसी पूर्ण करून १२ ते २४ तासांच्या आत कर्ज घेऊ शकतात. तथापि, ही रक्कम थेट खात्यात येईल, याचा उपयोग करून ग्राहक घरी बसून बँकेकडे पैसे मागू शकतात किंवा डिजिटल व्यवहार करून त्यांच्या गरजा भागवू शकतात.