स्वाईन फ्लूचे ‘हे’ नवे औषध भारतात उपलब्ध करा ; केंद्राकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वाईन फ्लूवर Pelamivir आणि Baloxavir ही नवी औषधे आली आहेत. यूके आणि जपानमध्ये या औषधांचा शोध लागला आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या वाढत असल्याने या नव्या औषधांची भारतात चाचणी करून ते औषध राज्यात उपलब्ध व्हावे, अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या संसर्गजन्य विभागाने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला पाठवले आहे.

राज्यात स्वाईन फ्लूमुळे बळी जाणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला पाठविण्यात आलेल्या पत्रात स्वाईन फ्लूच्या औषधाला वेगळा पर्याय म्हणून या दोन नवीन औषधांचे मूल्यांकन करावे असे सांगितले आहे. एखाद्या औषधाची चाचणी होऊन ते बाजारात येण्याच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यानंतर अन्न आणि औषधे प्रशासनाने मंजूर केल्यानंतर ही औषधे बाजारात विक्रीसाठी येतात. त्यामुळे ही एक खूप मोठी प्रक्रिया असते. ही नवी औषधे सध्या भारतात उपलब्ध नाहीत. ज्या व्यक्तींना अधिक ताप आहे शिवाय ज्यांना टॅमी फ्लूने आराम मिळत नाही अशा रूग्णांना ही नवी औषधे उपयोगी ठरतील. यासाठी या दोन नवीन औषधांच्या मूल्यांकनासाठी पत्र लिहिण्यात आले आहे.