कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्य अधिकारी द्यावा : सरपंच सुनिता धुमाळ

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ता. हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्य अधिकारी गेली अनेक महिने उपलब्ध नसल्याने येथील आरोग्य अधिकाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला असून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यावर त्वरित उपाययोजना करुन सहाय्यक आरोग्य अधिकारी द्यावा अशी मागणी होत आहे.

परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने कुंजीरवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या थेऊर येथे डेंगूने डोके वर काढले. तसेच नायगांव, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा येथे साथीच्या आजारांनी अनेक जण त्रस्त असल्याने या आरोग्य केंद्रात सध्या दररोज दीडशे पेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी येतात. येथील डाॅ. लुकडे हे सकाळी नऊ वाजल्यापासून अविरत सेवा देतात. परंतु या बरोबरच त्यांना अन्य गोष्टी सुध्दा पहाव्या लागतात. या आरोग्य केंद्रात एक सहाय्यक आरोग्य अधिकारी नियुक्ती आहे, परंतु गेली अनेक महिने तो उपस्थित नाही. यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्वरित एका दुसऱ्या डाॅक्टरची नियुक्ती करुन रुग्णांना त्वरित सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कुंजीरवाडी गावच्या सरपंच सुनिता संदीप धुमाळ यांनी केली आहे. अलिकडे या आरोग्य केंद्रात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री. चिंतामणी गणपती असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथे गेली अनेक दिवसापासून डेंगीच्या रुग्णामध्ये मोठी वाढ होत आहे. यामुळे या आरोग्य केंद्रावर अतिरिक्त ताण वाढलेला आहे. अशा वेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने शिकाऊ डाॅक्टरांची एखादी टीम उपलब्ध करून दिली तर अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल. अशा शिकाऊ डाॅक्टर लोणी काळभोर येथील आरोग्य केंद्रात जास्त पसंती देतात. यातील काही डाॅक्टर व शिकाऊ परिचारिका कुंजीरवाडी येथे उपलब्ध कराव्यात.

Visit : Policenama.com