एकतेसाठी खिलाफत चळवळ आवश्यक : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – खिलाफत चळवळीला देशाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. महात्मा गांधींनी ही चळवळ सुरू केली होती. देशातील एकता अबाधित राखण्यासाठी खिलाफत चळवळीची आजही आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. अखिल भारतीय खिलाफत कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त मुंबईत भायखळा ते हज हाऊस दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पवार बोलत होते.

या मिरवणुकीला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना पवार यांनी खिलाफत चळवळीचे महत्त्व सांगितले. पवार म्हणाले, खिलाफत कमिटीच्यावतीने मुंबईत ईद-ए-मिलादचा जल्लोष साजरा केला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. या उत्सवात पुन्हा एकदा सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे. या मिरवणुकीत धार्मिक एकतेचे, बंधुभावाचे अनोखे दर्शन घडत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. अशाचप्रकारे आपल्याला खिलाफत चळवळ दिनही साजरा करायचा आहे, असे पवार यांनी म्हटले.


तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बेळगाव : दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बेळगावमधील सावगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे सावगाववर शोककळा पसरली आहे. मृत चारही विद्यार्थी येथील गुड शेफर्ड शाळेचे विद्यार्थी असून ते दहावीत शिकत होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे ते दुचाकीवरून पोहायला सावगाव येथील तळ्यात गेले होते. मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला.

गौतम कलघटगी, अमन सिंग, चेतन भांदुर्गे आणि साहिल बेनके अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सावगाव बेनकनहळ्ळी मार्गावर हा तलाव आहे. ग्रामीण पोलिसांना सावगाव येथील तळ्यात काही विद्यार्थी बुडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तलावाच्या काठावर दुचाकी, कपडे आणि चप्पलचे चार जोड आढळून आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सावगाव ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. सायंकाळी चारही मृतदेह शोधण्यात यश मिळाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तलावात पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्यामुळे हे विद्यार्थी बुडाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यांना पोहता येत होते की, याबाबत माहिती घेण्यात येत आहे.