पंढरपूर : ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, दररोज 1 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना टाळेबंदी मुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सर्व मंदिरे उद्या, सोमवारपासून उघडण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. दर्शन व प्रार्थनेच्या वेळी मुखपट्टी वापरणे बंधनकारक असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरातील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सुरु होणार असल्याने भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे. त्यामाध्यमातून दररोज भाविकांना दर्शन दिले जाईल. त्यात ६५ वर्षावरील आणि १० वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये भाविकांना श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फक्त मुख दर्शन मिळेल.

राज्य सरकारच्या नियमांनुसार दर्शन देणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, त्याच अनुषंगाने आज ५ वाजता मंदिर समितीची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आल्यानंतर सर्व भाविकांना मुखपट्टी, शारीरिक अंतर आणि जंतुनाशक (सॅनिटायझर) ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

दिवाळीत आनंदोस्तव

एकीकडे दिपोस्तव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत असताना पंढरपुरात शनिवारी आनंदोस्तव साजरा करण्यात आला. राज्य सरकारच्या मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे पंढरीत स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरातील व्यापारी, भक्त, महाराज मंडळींनी पेढे, लाडू वाटप केले. १७ मार्च रोजी कोरोनाच्या संकटामुळे श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद केले होते. आता १६ नोव्हेंबरला मंदिर उघडणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह पसरला आहे.