नीरव मोदीचा भाऊ नेहल ५० किलो सोने घेऊन पसार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

पंजाब नॅशनल बँकेत १४ हजार कोटींचा गैरव्यवसार करून परदेशात पाळलेल्या निरव मोदीचा सावत्र भाऊ नेहाल देखील, दुबईतील एका सेफहाऊसमधून तब्बल ५० किलो सोने घेऊन फरार झालयाचे वृत्त आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहीती मिळाल्यानंतर नेहलने ५० किलो सोने घेऊन पळ काढला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नेहल हा मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्समध्ये कार्यरत होता. पीएनबी घोटाळ्यात नेहल हा आरोपी नाही. परंतु, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मनी लॉड्रिंगमध्ये त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दुबईतील नीरव मोदीच्या रिटेल आउटलेटमध्ये हे सोने विक्रीला ठेवण्यात आले होते. पीएनबी घोटाळ्याचा तपास करीत असलेली सीबीआय दुबईपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती वाटल्याने नेहलने विक्रीसाठी ठेवलेलं सर्व सोनं घेऊन दुबईतून पळ काढल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईतील विशेष कोर्टात गुरुवारी ईडीने २४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून यात नेहलचाही समावेश आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवस आधीच नीरव मोदीचा संपूर्ण परिवार परदेशात पळून गेला आहे. कर्ज मंजूर करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांना नेहलने आग्रह केला होता, अशी माहितीही समोर आली आहे.