‘NEET’चे वेळापत्रक जाहीर; अर्जासाठी 9 मार्चपर्यंत मुदत तर 6 मेला परीक्षा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) २०१८चे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर NEET ची परीक्षा ६ मे रोजी देशभरात घेतली जाणार आहे. त्याचबरोबर बोर्डाकडून फॉर्म आणि अभ्यासक्रम याबाबतची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एमबीबीएस/ बीडीएस या वैद्यकिय अभ्यासक्रमांसाठी NEET परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी यंदाच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नसून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारण्यात येणार आहे. देशभरातील वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा होणार असून यामध्ये दिल्लीतील AIIMS आणि पद्दुचेरीतील JIPMER या दोन महाविद्यालयांचा समावेश नाही.

परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांकरीता आधारची अट लागू नाही. तसेच अनिवासी भारतीयांना पासपोर्ट क्रमांक देणे बंधनकारक आहे.

NEETचा अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रकिया ऑनलाईन आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे CBSE ने स्पष्ट केले आहे.

यावर्षीच्या NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका ११ भाषांमध्ये असणार आहे. त्यात हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, गुजराती, ओडिया, बंगाली, आसामी, तेलुगु, तामिळ आणि कन्नड भाषांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाईट : www.cbseneet.nic.in