NEETPG – 2021 परीक्षाही पुढे ढकलली, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या, विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.

त्यातच आता भारत सरकारने मेडिकलच्या विद्यार्थ्याची NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 18 एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ट्विट डॉ. हर्ष वर्धन यांनी केले आहे. दरम्यान ठाकरे सरकारनेही वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी हा निर्णय घेतला आहे. 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.