पुण्यात वैद्यकीय उपचारांमध्ये हेळसांड ? डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय उपचारांमध्ये हेळसांड झाल्याने आणि ससून रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. पी लक्ष्मी नरसिंहन यांचे आज पहाटे निधन झाले. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त यांचेकडे रीतसर तक्रार नोंदविणार असल्याचे सांगुन या सगळ्या प्रकाराची माहिती पुणे शहर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रमेश अय्यर यांनी ‘पोलीसनामा’ला दिली.

काल (मंगळवारी) डॉ. नरसिंहन यांना बारीक ताप आला. रात्री श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांना नगर रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे त्यांची तपासणी झाल्यावर कुटुंबियांना सांगण्यात आले की, हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना अन्यत्र हलवावे. दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच खालावू लागली म्हणून नरसिंहन यांच्या कुटुंबियांनी माझ्याशी संपर्क साधला. लगेचच मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाने सुचविलेल्या वेबसाईटवर आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत का? त्याची माहिती घेतली. तेव्हा वेबसाईटवर, काही हॉस्पिटल्समध्ये आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. तर, काही हॉस्पिटलमध्ये असे बेड्स उपलब्ध नाहीत अशी माहिती दाखविली जात होती. जिथून बेड्स आहेत असे डशबोर्डवर दाखविले जात होते तिथे फोन करुन संपर्क केला असता आयसीयू बेड्स उपलब्ध नाहीत असे नरसिंहन यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आले. दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलेले आवाहन माझ्या लक्षात आले. ते असे की, अशाप्रसंगी रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करावे. तो संदर्भ लक्षात घेऊन मी त्या कुटुंबियांना डॉ.नरसिंहन यांना ससून रुग्णालयात तातडीने नेण्यासंबंधी सुचविले त्याप्रमाणे त्यांना ससूनमध्ये नेण्यात आले. पण, त्यांच्या अगोदर तीन रुग्ण रांगेत होते आणि रुग्णालयात आयसोलेशन आयसीयू बेड उपलब्ध नाहीत असे समजले. स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे यांनीही ससूनच्या वरीष्ठांशी संपर्क साधून उपचारांसाठी प्रयत्न केले. पेशंटला ऑक्सिजन लावलेला होता. पण, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता. अखेरीस रात्री दोन वाजता नरसिंहन यांचे प्राणोत्क्रमण झाले.

योग्य ते उपचार वेळेत मिळू न शकल्याने नरसिंहन यांचे निधन झाले. यासाठी प्रशासनातील कोणाला जबाबदार धरावे? आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार? तसेच डॅशबोर्डवर देण्यात येत असलेली माहिती दिशाभूल करणारी आहे का? असा सवाल अय्यर यांनी या सगळ्या घटनाक्रमाची माहिती देताना केला.

गेल्या आठवड्यात दुधाने नावाच्या रुग्णाचा मृत्यूही वैद्यकीय हेळसांड झाल्यानेच झाला. त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदविली आहे. डॉ.नरसिंहन यांच्याबाबतही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे असे अय्यर यांनी सांगितले.