राज्यभरात पुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, ‘कॅग’चा ठपका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात उभारण्यात येणार्‍या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. देखभालीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे पुलांना धोका निर्माण झाला असल्याचे निरीक्षण भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षकांनी ( कॅग) नोंदविले आहे.

नागरिकांसाठी पूल बांधल्यावर त्यांची देखभाल होणे आवश्यक आहे. त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यंत्रणांकडून केली जाते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानेच तेवढा निधी उपलब्ध होण्यात अडचण येते. त्यातूनच देखभाल आणि दुरुस्ती होत नाही, असे निरीक्षण कॅगने नोंदविले आहे. पूल बांधून झाल्यावर त्याची योग्य माहिती ठेवणे आवश्यक असते. कधी बांधला, किती वजन वाहून नेण्याची क्षमता आदी माहितीचा त्यात समावेश असतो. परंतु काही पुलांबाबत अशीच माहिती ठेवण्यात आली नव्हती, असे आढळले.

ऑगस्ट 2016 मध्ये मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळून 41 जण मरण पावले होते. यानंतर राज्यातील सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्यात आला होता. तेव्हा राज्यात 16 हजारांपेक्षा जास्त पूल होते. यापैकी 14,003 पूल हे छोटे, 1998 मोठे तर 84 लांब आकाराचे पूल होते. दुर्घटनेनंतर दोन वर्षांनेही जवळपास 200च्या आसपास पुलांचे सर्वेक्षणच झाले नव्हते. या सर्वेक्षणानंतर 2635 पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.