व्यावसायिक वास्तूच्या नोंदीकडे दुर्लक्ष; लाखोंचा महसूल बुडतोय

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावरील बहुतेक सर्व गावात व्यावसायिक इमारती गोडाऊनसह मोठे पत्राशेडची ग्रामपंचायत दप्तरी नोंदच नसल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, तर दुस-या बाजूस सर्वसामान्य नागरिक घराच्या नोंदीसाठी ग्रामपंचायतीत हेलपाटे घालतो. मात्र, त्यांच्या घराच्या नोंदीची आडवणूक केली जाते.

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर कुंजीरवाडी थेऊर या गावातील नागरिकांच्या नवीन घराच्या नोंदीची अनेक प्रकरणे प्रलंबित असून, याची समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. आपल्या स्वप्नातील घर असावे अशी सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. रात्रंदिवस कष्ट करून तो यासाठी धडपड करतो, परंतु अनेक अडचणी समोर येतात, अशावेळी कर्ज काढण्यासाठी घराच्या नोंदीची आवश्यकता असते, परंतु ती वेळेवर होत नाही. सध्या या गावातील अनेक नोंदी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे .

पुणे शहराचे उपनगर म्हणून उदयास येत असणा-या पुणे-सोलापूर महामार्गावरील गावात बाजारपेठेचे जाळे उभे राहत असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या दुकानांपासून स्थानिक ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळत असते; परंतु यातील अनेक गोडाऊन व्यावसायिक गाळे मोठ मठे पत्र्यांचे शेड यांची नोंद केलेलीच नाही. त्यामुळे यापासून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न दरवर्षी बुडत आहे. या उत्पन्नाचा उपयोग गावच्या विकासावर खर्च करता येणार आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील थेऊरफाट्यापासून कुंजीरवाडी गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्या काही वर्षांत नवनवीन व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे; परंतु स्थानिक ग्रामपंचायतीने याची नोंद का केली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. अशाच प्रकारची परिस्थिती इतर ठिकाणी असल्यास आश्चर्य नसावे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक कार्यरत असतो. त्यांनी गावच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधले पाहिजेत, मग अशा व्यावसायिक गाळ्यांकडे का दुर्लक्ष होत आहे, याची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.