बारामती मतदार संघात फिरणाऱ्या ‘त्या’ फसव्या मेसेजकडे दुर्लक्ष करा : मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे मोदींनी महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्ये शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच बुधवारी सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्यानंतर त्यांनी वरिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी व्हायरल होणाऱ्या एका मेसेजकडे मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी आणि शरद पवार यांचे एकमेकांशी संबंध असल्याचे फसवे मेसेज करून कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्याचे प्रकार विरोधकांकडून करण्यात येत आहेत. या स्टंटबाजीकडे लक्ष देऊ नका,’ असे स्पष्ट करून यंदा बारामती जिंकायची आहे असा निरोपही कार्यकर्त्यांना दिला.

कोण काम करते आहे ते मतदानावरून कळेलच
या बैंठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जास्त जोमाने काम करायचे आहे असे ते म्हणाले. तसेच ‘दोन्ही पक्षाने मिळून काम करायचे आहे. जे कोणी काम करणार नाही ते संबंधितांच्या ठिकाणी झालेल्या मतदानावरून समजेलच ‘असे देखील ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी यश-अपयशाचे श्रेय तुमचे आहे, चांगले काम करा असा सल्ला देखील दिला. या बैठकीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा, त्यासाठीची दुचाकी रॅली, बूथनिहाय मतदान घडवून आणण्याच्या तयारीचा आढावा घेतला. मोदी यांच्या अकलूज येथील सभेनंतर बारामतीच्या सद्यस्थितीचा आढावाही संबंधितांनी मुख्यमंत्र्यांना कथन केला.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह सर्व आमदार, प्रमुख कार्यकर्ते, नगरसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.