धर्म की विज्ञान सर्वात महत्वाच काय, याचे उत्तर देणाऱ्या IAS नेहा बॅनर्जीचा प्रेरणादायी प्रवास, जाणून घ्या

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – कोलकात्याच्या नेहा बॅनर्जीने 2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (Union Public Service Commission ) 20 वा क्रमांक मिळवला होता. नोकरी करताना तयारी करूनही तिने पहिल्याच फटक्यात यशाला गवसणी घातली. मुलाखतीत तिला विचारलेल्या एका अवघड प्रश्नाला तिने दिलेल्या संतुलित उत्तराने तिचे ध्येय सहजसाध्य झाले. बुद्धिमत्ता आणि उच्च विचारांच्या आधारावर हे यश मिळवणाऱ्या नेहाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जाणून घेऊ या तिचा हा प्रवास.

नेहा बॅनर्जी (Neha Banerjee) 2019 च्या तुकडीची आयएएस अधिकारी आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या नेहाने लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. 2011 मध्ये तिच्या वडीलांचे निधन झाले. या घटनेने खचून न जाता तिच्या आईने एकटीनेच तिला वाढवले. नेहाने आईच्या कष्टाचे चीज करत, 2018 मध्ये आयआयटी खरगपूर इथून इंजिनीअरिंगचे शिक्षण (IIT Khragpur) पूर्ण केले आणि नोएडातील एका कंपनीत नोकरी मिळवली. नोकरी करताना तिने यूपीएससीची तयारी केली आणि मुलाखतीच्या 15 दिवस आधी नोकरीचा राजीनामा दिला. मुलाखतीसाठी देखील तिने स्वतःच तयारी केली होती. त्यामुळेच कदाचित ती मुलाखतीत अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे देण्यासाठी सामोरे गेली.

आयआयटीत शिकत असताना तिला एक विज्ञान विषयाची शिष्यवृत्ती मिळत होती. त्याआधारे तिला एक कठीण प्रश्न या मुलाखतीत विचारला गेला. त्याचे तिने अगदी मार्मिक उत्तर दिले. तिला विचारले होते की, विज्ञान आणि धर्म यात महत्त्वाचे काय आहे ? त्यावर हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, असे उत्तर तिने दिले. तेव्हा मुलाखतकर्त्यांनी विचारले की, विज्ञान हे तर्कावर आधारीत आहे, आणि धर्म हा आपल्या विश्वासावर आधारित आहे. तुम्ही काय महत्त्वाचे मानता?

हा प्रसंग सांगताना नेहा म्हणाली की, अशा प्रश्नांद्वारे तुमचे व्यक्तिमत्त्व जाणून घेतले जाते. मी देखील या प्रश्नाचे संतुलित उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी म्हटले या दोन्हींची भूमिका वेगवेगळी आहे. या दोन्ही बाबींना एकत्र करण्याची काय गरज आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या दिशांना नेतात. विज्ञान आपल्याला एका वेगळ्या दिशेने पुढे नेते तर धर्म एक वेगळी ताकद देतो, हे उत्तर मुलाखत घेणा-यांना आवडले.

या परीक्षेच्या तयारीबाबत बोलताना नेहा म्हणाली, या परीक्षेची तयारी करताना, माझी इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असल्याने मी थोडी काळजीत होते. सुरुवात मी वर्तमानपत्रे वाचण्यापासून केली. त्यानंतर मी अभ्यासक्रम आणि त्याच्या तयारीची पद्धत समजून घेतली. इतिहास, भूगोल, पॉलिटिक्स, जनरल सायन्स अशा विषयांचा अभ्यास करणेही आवडू लागले. या परीक्षेतील टॉपर्सच्या मुलाखती ऐकल्या. अनेकांनी मला प्रभावित केले. मला आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नव्हते त्यामुळे नोकरी चालू ठेवूनच या परीक्षेची तयारी केली आणि अखेर ध्येय साध्य केले. अभ्यासक्रम समजून घेऊन व्यवस्थित नियोजन करून कठोर परिश्रम केले तर ही परीक्षा सहज उत्तीर्ण होता येते, असा सल्ला नेहाने दिला आहे.