दुधामृत देऊन ‘तिने’ वाचवले अनेक नवजात जीव

पोलीसनामा ऑनलाइन – दूध हे नवजात बाळांसाठी अमृत आहे. हे दूध न मिळाल्यास या बाळांचं जीवन धोक्यात येऊ शकतं. मातेचं दूध न मिळाल्याने जगभरात तेरा लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. अशा बाळांना दूधदान करून वाचवता येणे शक्य आहे. दूधदानाचं हे महत्व समजल्यानंतर मुंबईतील नेहा नाडकर्णी यांनी दूधदान करून अनेक बाळांचा जीव वाचवला आहे. वर्षभरात नेहा यांनी ४ वेळा दूधदान केलं असून आतापर्यंत त्यांनी तब्बल १५ लीटर दूध दान केलं आहे.

ह्युमन मिल्क खूप काळ टिकतं. रूम टेम्परेचर ३ ते ४ तास, रेफ्रिजरेटरमध्ये १२ ते २४ तास आणि फ्रिजरमध्ये २ ते ३ महिने राहतं. रुग्णालयातील रेफ्रिजरटेरमध्ये हे दूध ६ महिन्यांपर्यंत चांगलं राहतं. मात्र रुग्णालयातील दुधाचा साठा २ आठवड्यातचं संपतो. त्यामुळे दूध फेकून देऊ नका, दान करा, असं आवाहन नेहा यांनी केलं आहे.

प्रथम नेहा यांनाही दूधदानाबाबत माहिती नव्हती. बाळासाठी आईचं दूध महत्वाचं आहे हेच त्यांना माहिती होतं. यानंतर त्यांनी लॅक्टेशियन कन्सलटंट डॉक्टरांची भेट घेतली. या डॉक्टरांनी त्यांना दूधदानाबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर त्यांनी केवळ आपल्या बाळाला नव्हे, अनेक गरजू बाळांना आपलं दूध दिलं. याबाबत प्रतिक्रिया देताना नेहा नाडकर्णी म्हणतात, सप्टेंबर २०१७ मध्ये माझी प्रसूती झाली, मात्र दूध दानाबाबत मला ऑक्टोबर २०१७ मध्ये समजलं मला माझ्या बाळाला माझं दूध द्यायचं होतं म्हणून मी लॅक्टेशियन कन्सलटंट डॉक्टरला भेटले. त्यावेळी मला त्यांनी दूधदानाबाबत सांगितलं.

माझ्या बाळाशिवाय इतर बाळांनाही मी माझं दूध देऊ शकते, याशिवाय दुसरा आनंद काय असेल. मी इतर बाळांसाठी दूध दान करण्याचा निर्णय घेतला. नेहा यांच्या दूधदानाच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबानंही पाठिंबा दिला. मला दूधदान करायची इच्छा आहे, हे मी माझ्या पतीला सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्या खाण्यापिण्याची, आरोग्याची काळजी घेतली. नोव्हेंबरमध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांनी मिल्क पंप भेट म्हणून दिला. २ महिन्यांत ३ लीटर दूध जमा झालं. जानेवारी, २०१८मध्ये सायन रुग्णालयात पहिलं दूधदान केलं. वर्षभरात मी १५ लीटर दूधदान केलं. ९ ते १० तास बाळाला स्तनपान याशिवाय दिवसभरात २ किंवा त्यापेक्षा जास्त तास दूध पंप करणं, यामुळे मला खूप त्रास व्हायचा मात्र माझ्या कुटुंबानं मला आधार दिला. नेहा यांनी आपला हा निर्णय स्वत:पुरती मर्यादित ठेवला नाही. तर त्यांनी दूधदानाबाबत जनजागृतीही सुरू केली.